जैन सम्राट चंद्रगुप्त यांना पडलेली स्वप्ने….(स्वप्न क्रमांक दोन.)
जैन सम्राट चंद्रगुप्त यांना पडलेली स्वप्ने….(स्वप्न क्रमांक दोन.)
-विठ्ठल साठे.
काल मी चंद्रगुप्त यांना पडलेल्या क्रमांक एकच्या स्वप्नासंबंधी लिहिले होते. आज क्रमांक दोनचे स्वप्न.
२) सम्राट चंद्रगुप्ताला विशाल कल्पवृक्षाची फांदी तुटून पडताना दिसली.
आचार्य भद्रबाहु यांनी सांगितलेला स्वप्नाचा अर्थ:- कल्पवृक्ष म्हणजे राजा.कल्पवृक्ष जसा मानवाच्या सर्व आवश्यकतांची पूर्तता करतो. तद्वतच राजा असतो. राजा प्रजेचा पालनकर्ता असतो. प्रजेला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे. प्रजेला सतत सुखी ठेवण्यासाठी राजा तत्पर असणे. हे राजाचे कर्तव्य असते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राजाने प्रजेचे रक्षण करणे हे त्याचे परम कर्तव्य असते. राज्यात शांतता आणि आनंद टिकवून ठेवणे राजाचे काम असते. आतापर्यंत असे राजे होऊन गेले आहेत.
परंतु आता दु:षम काळ सुरू आहे. या पुढे असे प्रजारक्षक राजे होणार नाहीत. यापुढे होणारे राजे लोभी, स्वार्थी आणि सत्तेची प्रचंड हाव असणारे असतील. प्रजेला सतत त्रास देतील. विविध प्रकारचे कर प्रजेवर लादून प्रजेची पिळवणूक करतील. प्रजेच्या धनावर ते आपल्या विलासी गरजा भागवून घेतील. असे करताना त्यांना कसल्याही प्रकारचा संकोच वाटणार नाही. उलट असे करणे आपला अधिकार आहे. असे ते समजतील. आपण प्रजेसाठी नसून प्रजा आपल्यासाठी आहे. अशी अहंकारी वृत्ती त्यांच्यात दृढ होईल. स्वतः साठी धनसंपत्ती जमा करणे यावर त्यांचा भर असेल. ते प्रजेला अपायकारक असतील. ऋषी, मुनी, विचारवंत यांचा ते आदर करणार नाहीत….असा अर्थ आचार्य भद्रबाहु यांनी सांगितला.
सम्राट चंद्रगुप्त आणि भद्रबाहु यांचा काळ इसवी सन पूर्व चौथे शतक.जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी राजाविषयी कोणता मतप्रवाह त्या काळात होता.हे स्वप्नाचा अर्थ समजून घेताना येते. राजाला प्रजेचा पालक मानले जात होते.आणि राजा सुद्धा प्रजेचा पालक म्हणूनच राज्य करीत असे.राज्याभिषेक होत असताना राजाला प्रजेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागत असे.त्या शपथेत …मी योग्य प्रकारे राज्य करु शकलो नाही तर मला राजेपदावरून काढून टाकण्याचा अधिकार प्रजेला असेल…. अशी हमी नमूद केलेली असे. ही त्या काळातील अत्यंत महत्त्वाची बाब होती.
भारताच्या प्राचीन इतिहासाची पाने चाळताना या सर्व श्रेष्ठ, भव्यदिव्य आणि मंगल गोष्टी आढळून येतात नि त्या थक्क करून जातात.त्या काळाची आणि आताच्या काळाची तुलना केली की कोड्यात पडल्यासारखे वाटते. असो.
तीन हजार वर्षांपूर्वी सम्राट चंद्रगुप्त यांना पडलेले स्वप्न आणि त्या स्वप्नाचा भद्रबाहु यांनी सांगितलेला अर्थ विचारात घेऊन विचार केल्यास आचार्य भद्रबाहु तीन हजार वर्षांपूर्वी जे बोलले ते सत्यात उतरत गेल्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.ही भव्य दृष्टी जैन आचार्यांचीच होती. हजारो वर्ष पुढे पाहाण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते.असे मी म्हटलं तर कुणी भाबडेपणा समजू नये.
जय जिनेंद्र!
विठ्ठल साठे.
निमंत्रक, जैन विचार मंच.
अध्यक्ष, श्री सुपार्श्वनाथ अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट.सातारा.
Title : King chander gupt ke supne